मिरज तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा रंग चढायला सुरुवात झाली असून, महायुतीच्या अंतर्गतच आता राजकीय कुस्ती सुरू झाली आहे. भाजप, राष्ट्रवादी अजितदादा गट आणि जनसुराज्य शक्ती पक्ष — या तिन्ही महायुतीतील घटक पक्षांतील प्रमुख नेत्यांमध्ये मतदारसंघावर वर्चस्व मिळवण्याची शर्यत जोरात सुरू आहे.
या मतदारसंघात भाजपचे नेते व विद्यमान आमदार सुरेश खाडे, राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार इद्रिस नायकवडी, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि जनसुराज्य शक्तीचे युवा नेते सुमित कदम — हे चौघेही नेते एकाच महायुतीचे भाग असले तरी, प्रबळ स्वार्थ आणि पक्षीय वर्चस्वाच्या स्पर्धेमुळे आंतरिक संघर्ष सुरू झाला आहे.
मिरज मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र सत्तांतरानंतर महायुतीची पकड इथे वाढली आहे. यामध्ये भाजपची संघटनशक्ती, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा ग्रामीण भागातील प्रभाव आणि जनसुराज्य शक्तीचा तरुण वर्गातील पायापक्कड भूमिका दिसून येते.
मात्र एकच आखाडा आणि चार दावेदार. त्यामुळे महायुती मजबूत असूनही अंतर्गत गटबाजी, मतभेद, आणि नेतृत्वाच्या दाव्यांमुळे एकसंधपणा कमी झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
महाविकास आघाडीकडून काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) देखील मैदानात उतरतीलच. मात्र महायुतीतील अंतर्गत स्पर्धेमुळे या आघाडीला काही प्रमाणात संधी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या चारही नेत्यांची निवडणुकीतील भूमिका, स्थानिक पातळीवरील त्यांचा प्रभाव आणि पक्षीय सोबत किती नेता खेचतो, यावरच मतदारसंघाचे भवितव्य ठरणार आहे.
0 Comments