सांगली, ५ जून: सांगलीमध्ये खुनाचं सत्र थांबतच नसून गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आज सकाळी शंभर फुटी रोडवरील घाडगे पाटील शोरूमसमोर एका भाजी विक्रेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली.
ही धक्कादायक घटना आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. शंभर फुटी परिसरात दररोज सकाळी होलसेल भाजी बाजार भरतो. पहाटेपासून येथे विविध प्रकारच्या भाज्यांची खरेदी-विक्री केली जाते. याच बाजारात महेश कांबळे (पूर्ण नाव) हा कोथिंबीर विक्रीचे काम करत होता.
दरम्यान, काही अज्ञात इसमांनी त्याच्या डोक्यात दगड व चाकूने वार करत त्याचा निर्घृण खून केला आणि ते आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
प्राथमिक माहितीनुसार, मृत महेश कांबळे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. तो यापूर्वी एका गुन्ह्यात शिक्षा भोगून नुकताच बाहेर आला होता, अशी माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर सांगली शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती, त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे.
0 Comments