सांगली शहरातील मराठा समाज भवनजवळ आज (२० जुलै) सकाळी साडेसहा वाजता एसटी बसचा भीषण अपघात घडला. ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने अचानक बससमोर वाहन आणल्याने चालकाने बस वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेगात असलेल्या बसचा तोल गेल्यामुळे ती थेट रस्त्यालगत असलेल्या झाडावर आदळली. अपघाताच्या तीव्रतेमुळे झाडही उन्मळून बसवर कोसळले.
या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने बसमधील प्रवाशांना फारशी इजा झाली नाही. मात्र, बस आणि झाड दोन्ही रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला.
गेल्या महिन्यातही याच परिसरात अशाच प्रकारचा अपघात झाला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी याठिकाणी अधिकृत गतिरोधक (स्पीड ब्रेकर) आणि सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
0 Comments