सांगली कुपवाड शहरात बुधवारी (दि. २३ जुलै) पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली. रामकृष्णनगर येथे राहणाऱ्या अमोल सुरेश रायते (वय ३२) या युवकाचा अज्ञात व्यक्तीने निर्घृण खून केला असून, त्याचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर, सांगली–कुपवाड मुख्य रस्त्यालगत आढळून आला. या घटनेने परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हत्या की पूर्वनियोजित कट?
पहाटे पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व पथके तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. प्राथमिक तपासात असे स्पष्ट झाले आहे की, ही हत्या अतिशय क्रूर पद्धतीने करण्यात आली आहे. घटनास्थळी रक्ताचे डाग, झटापटीचे पुरावे आणि इतर महत्त्वाचे संकेत सापडले आहेत.
पोलीस तपासाची गती वाढली...
या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, एपीआय दीपक भांडवलकर, मिरज पोलीस उपविभागीय अधिकारी किरण रासकर, ग्रामीण एपीआय तिप्पे, आणि फॉरेन्सिक पथकप्रमुख कैलास मिलिंद व त्यांच्या टीमने घटनास्थळी सखोल तपास केला. साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल टॉवर लोकेशन आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.
नातेवाईकांचा आक्रोश, परिसरात तणाव...
घटनेची माहिती मिळताच मृत अमोल रायते याचे नातेवाईक घटनास्थळी आले. त्यांच्या रडण्याचा आवाज आणि आक्रोशाने वातावरण भारले गेले. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवून तणाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे.
संशयित व्यक्तींवर लक्ष केंद्रित...
पोलीस सध्या काही संशयित व्यक्तींवर लक्ष केंद्रित करत असून, आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तपास सुरू आहे.
0 Comments