मिरज शहरातील विजापूर वेस परिसरात असलेल्या एका बारमध्ये सोमवारी रात्री जोरदार हाणामारीची घटना घडली. बारमध्ये सुरू झालेल्या वादातून दोन गट आमने-सामने आले आणि संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्वेश घोडके (रा. नदीवेस, मिरज) व त्याचा मित्र प्रणव हे बारमध्ये गेले होते. त्याचवेळी जुल्लू बेपारी व समीर मुल्ला (रा. गुरुवार पेठ) हे देखील बारमध्ये होते. विश्वेशने काउंटरवर वाद घालण्यास सुरुवात केली आणि अचानकच बारमधील काचफोड व तोडफोड सुरू केली. यावेळी उपस्थित असलेल्या जुल्लू व समीरने त्याला विरोध केला, त्यामुळे वाद उग्र बनला.
त्यानंतर विश्वेशने जुल्लू व समीरला शिवीगाळ व मारहाण केली. परिस्थिती अधिक बिघडल्याने जुल्लूने आपल्या समर्थकांना बोलावले. बारमधून बाहेर पडून भाजी मंडईजवळ दोन्ही गट पुन्हा आमने-सामने आले आणि तेथे तुफान हाणामारी झाली. काही वेळातच विश्वेशचे समर्थकही घटनास्थळी दाखल झाले, आणि संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि हस्तक्षेप करत दोन्ही गटांना पिटाळून लावले. यावेळी विश्वेश पळून गेला, तर प्रणवला पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनेनंतर बेपारी आणि मुल्ला यांचे समर्थक मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यासमोर जमले. त्याच वेळी विश्वेशचे काही समर्थकही तेथे पोहोचल्याने पुन्हा एकदा गोंधळ झाला. यामध्ये विश्वेशच्या एका साथीदाराला बेदम मारहाण करण्यात आली.
शहर पोलिसांनी दोन्ही गटांवर नियंत्रण मिळवत परिस्थिती आटोक्यात आणली असून, या प्रकरणी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
0 Comments