राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, राज्य सरकार व निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका लवकर घ्याव्यात असे निर्देश दिल्यानंतर आता प्रशासनाने या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.
राज्यातील महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायती यांच्या प्रभाग रचना प्रक्रिया सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. यासाठी 11 ते 16 जून या कालावधीत प्रगणक गटांची मांडणी करण्यात येणार आहे. त्यानंतर 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना जारी होणार आहे.
निवडणूक आयोगाने राज्य सरकारला प्रभाग रचनेचे आदेश दिल्यानंतर, त्यानुसार महापालिका आयुक्त, नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना अधिकृत पत्राद्वारे सूचना पाठवण्यात आल्या आहेत. 11 जूनपासूनच ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी आयोगाच्या वेळापत्रकानुसार सर्व कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रभाग रचना ही निवडणुकीतील अत्यंत महत्त्वाची पायरी मानली जाते. यामुळे संभाव्य उमेदवार, राजकीय पक्ष व नागरिकांचे लक्ष या प्रक्रियेवर केंद्रित झाले आहे. आयोग व राज्य शासन एकत्रितपणे नियोजनबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडत आहेत.
0 Comments