सुंदर दिवसाची सुरुवात जर कुठल्या आवाजाने होत असेल, तर ती म्हणजे पिंगळ्याचा डमरू आणि वासुदेवाच्या टाळ मृदंगाचा सूर. पहाटेच्या या धार्मिक सुरांनी गावाचे वातावरण आध्यात्मिकतेने भारावून जाते. अशा परंपरांचा वारसा आजही सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील आरवडे गावात जिवंत आहे – तो म्हणजे श्री जयवंत जगन्नाथ मोरे (वय ७६) यांच्या रूपाने.
पिंगळा आणि वासुदेव हे दोन श्रद्धेचे प्रतीक आहेत. एक पहाटे गावात फिरून शुद्धतेचा संदेश देतो तर दुसरा दारोदारी जाऊन "वासुदेव आला वासुदेव आला, माय माऊली थोडं धान्य दे गं आई" असे म्हणत हरिनामाचा गजर करतो.
श्री जयवंत मोरे हे अशा परंपरागत वासुदेव परंपरेचे चौथ्या पिढीचे प्रतिनिधी असून, त्यांनी आजवर ही परंपरा स्वतःच्या कलेतून जपली आहे – कोणत्याही मोबदल्याशिवाय, केवळ परमेश्वराच्या सेवेसाठी. आजही ते सांगली जिल्ह्यातील आटपाडी, विटा, दिघंची, महूद, कोल्हापूर, इस्लामपूर, मिरज व खानापूर तालुक्यांतील ग्रामीण भागात वासुदेव म्हणून फिरताना दिसतात.
काळ बदलला, जीवनशैली बदलली, पण या परंपरेतील भाव, श्रद्धा आणि समर्पण आजही तितकेच गूढ आणि भावनिक आहे. पूर्वी जिथे माय माऊली सुपाने जोंधळे वासुदेवाच्या झोळीत टाकायची, तिथे आज ओझळभर धान्य दिलं जातं.
परंतु या परंपरेच्या जोपासकांना आजही शासकीय मान्यता किंवा मदत मिळालेली नाही. याच संदर्भात श्री जयवंत मोरे यांनी शासनाकडे, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे एक आर्त विनंती केली आहे – "आम्हाला देखील कलावंत म्हणून मान्यता मिळावी, आमच्या कलेला अनुदान मिळावं, गरजूंना किमान पेन्शन तरी द्यावी."
वासुदेव आणि पिंगळा यांची व्यथा ही एक परंपरेची पुकार आहे. ही पुकार सरकारने ऐकावी आणि या श्रद्धेच्या सेवकांना न्याय मिळावा हीच अपेक्षा.
0 Comments