सांगली :
देशाच्या सीमांवर वाढता तणाव आणि गुप्त ऑपरेशनच्या पार्श्वभूमीवर सुमारे ३० हजार जवानांची अचानक मोठी हालचाल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या हालचालीत सांगली जिल्ह्यातील मोठ्या संख्येने जवानांनी सहभाग घेतला असून, देशासाठी योगदान देणाऱ्या सांगलीच्या मातीतून हे चित्र अभिमानास्पद ठरत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून, विशेषतः सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागांमधून लष्करी शिबिरात तैनात असलेले जवान अल्पावधीतच सीमेवर रवाना झाले आहेत. सुट्ट्यांवर घरी आलेले अनेक जवानही तातडीने परत बोलावण्यात आले असून, ‘ऑपरेशन गुप्तसिंधू’ अंतर्गत ही हालचाल झाल्याची प्राथमिक माहिती मिळते.
सांगली जिल्ह्यातील खंडेराजुरी, आटपाडी, जत, मिरज, वाळवा आदी भागांतून अनेक जवान कुटुंबीयांचा निरोप घेत देशासाठी सज्ज झाले. रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, तसेच गावाच्या चौकांतून ‘भारत माता की जय’, ‘जय जवान’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.
जवानांच्या कुटुंबीयांनी यावेळी अभिमान आणि चिंता अशा दोन्ही भावनांनी ओतप्रोत होऊन औक्षण करत निरोप दिला. अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत जवानांचे स्वागत व निरोप सोहळे साजरे केले. लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकजण जवानांच्या देशसेवेवर गौरवाने बोलताना दिसत होते.
अधिकारिक स्तरावर हालचालीचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नसले, तरीही देशात गुप्त पातळीवर काही मोठे ऑपरेशन सुरू असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या देशभरातून लष्करी तैनातीबाबत हालचाली वेगाने सुरू आहेत.
0 Comments