सांगली : सांगली शहरातील शिंदेमळा परिसरात कुरणे गल्लीत आज सकाळी एक अंगावर शहारा आणणारी घटना घडली. पतीने पत्नीच्या डोक्यात कुराड घालून तिचा जागीच खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मयत अनिता सीताराम काटकर या भाजी विक्रीचा व्यवसाय करत होत्या. त्या त्यांच्या पती सिताराम काटकर यांच्यासोबत मिळून हा व्यवसाय चालवत होत्या. मात्र घरगुती वाद विकोपाला गेल्याने आज सकाळी साडेपाचच्या सुमारास सिताराम यांनी अनिता यांच्या मानेवर कुराडीने सपासप वार करत त्यांचा खून केला.
या हल्ल्यात अनिता काटकर यांचा जागीच मृत्यू झाला असून, खुनानंतर आरोपी पती सिताराम काटकर स्वतःहून संजयनगर पोलीस स्टेशनला जाऊन आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवला आहे.
या घटनेमुळे शिंदेमळा परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार हा खून घरगुती वादातून झाल्याचे सांगण्यात येत आहे.
0 Comments