"🚨 सिनेस्टाईल लूट! बेडग रस्त्यावर सात लाखांची लूट!"
मिरज तालुक्यातील बेडग-मंगसुळी रस्त्यावर गुरुवारी पहाटे एक धक्कादायक आणि सिनेस्टाईल लुटीची घटना घडली. पुणे येथून विजापूरला किराणा माल खरेदीसाठी जात असलेल्या दोन व्यापाऱ्यांच्या पिकअपचा पाठलाग करून दोन चारचाकी गाड्यांमधून आलेल्या अज्ञात लुटारूंनी सात लाख रुपयांची रोख रक्कम लुटून नेली.लक्ष्मण कदम (वय २९) व विकास शंकरराव सोनटक्के (वय ३५, दोघे रा. मुळशी, पुणे) अशी लुट झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. हे दोघे किराणा माल खरेदीसाठी पुण्याहून विजापूरला पिकअप गाडीतून निघाले होते.
बेडग-मंगसुळी रस्त्याजवळील पाटील वस्ती परिसरात पहाटे सुमारास दोन चारचाकी वाहनांनी या पिकअपचा पाठलाग केला. काही अंतरावर एका चारचाकीने पिकअप गाडी आडवी मारत थांबवली. त्यानंतर कोयत्याने पिकअपच्या पुढील काचेवर जोरदार हल्ला करण्यात आला.
हा प्रकार घडताच भयभीत झालेले व्यापारी गाडी रस्त्याच्या कडेला लावून तात्काळ वाहनातून उतरून पळून गेले. लुटारूंनी गाडीतून उतरून पिकअपमधील सात लाखांची रोख रक्कम हिसकावली आणि वेगात दोन्ही चारचाकींमधून पसार झाले.
ही घटना पहाटे चारच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सध्या सांगली जिल्हा पोलीस यंत्रणा लुटारूंचा तपास घेत आहे. या सिनेस्टाईल लुटीमुळे ग्रामीण भागात रात्री प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
0 Comments