बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव आणि परिसरातील गावांमध्ये आधी केस गळती, आणि आता नखं गळतीच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेला हा रहस्यमय प्रकार अजूनही आरोग्य विभागाच्या नियंत्रणाबाहेर आहे.
आज (दि. २१ एप्रिल) पुणे येथून आलेल्या आरोग्य विभागाच्या संयुक्त संचालक डॉ. बबिता कमलापूरकर यांनी बोंडगावला भेट दिली. त्यांनी या आजाराने बाधित नखं गळणाऱ्या रुग्णांची पाहणी आणि थेट संवाद साधला.
विशेष म्हणजे, मोजून तीन महिन्यांपूर्वी याच गावात केस गळतीची लाट उसळली होती. त्यावेळी दिल्लीच्या आयसीएमआर (ICMR) पथकाने गावात येऊन केस, नखं, पाणी, अन्नधान्य आणि रक्त नमुने घेतले होते. मात्र, या तपासणीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, आणि तोपर्यंत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
नव्या नखं गळतीच्या घटनांनी आरोग्य प्रशासन पुन्हा खडबडून जागं झालं असून, दिल्लीहून आणखी एक आरोग्य पथक उद्या गावात दाखल होणार असल्याची माहिती आहे.
“गावकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. सर्व प्रकारच्या तपासण्या सुरू आहेत आणि लवकरच याचे मूळ कारण समोर येईल,” असं आश्वासन डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिलं आहे.
या विचित्र आणि चिंताजनक प्रकारामुळे बोंडगाव पुन्हा एकदा राज्यस्तरीय चर्चेचा विषय बनला आहे.
0 Comments