सांगली जिल्ह्यातील नऊ पोलिस ठाण्यांमधील १७ गुन्ह्यात जप्त केलेला ८१३ किलो वजनाचा अमली पदार्थाचा साठा शासकीय पद्धतीने नष्ट करण्यात आला. गांजा, ब्राऊन शुगर, कोकेन या पदार्थांच्या या साठ्याचे मूल्य अंदाजे ८४ लाख रुपये आहे. १९८६ ते २०२४ या कालावधीत जमा झालेला हा साठा केंद्रीय अमली पदार्थ गोदामात साठवला होता. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या निर्देशानुसार एनडीपीएस कायद्याच्या कलम ५२ (अ) नुसार ही नष्टीकरण प्रक्रिया पार पाडण्यात आली.
मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवस कार्ययोजनेचा भाग
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अँटी-ड्रग्ज टास्क फोर्सच्या बैठकीत जप्त केलेल्या अमली पदार्थाचा साठा नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयीन परवानगी मिळवून मिरज एमआयडीसीमधील सूर्या सेंटर ट्रीटमेंट फॅसिलिटी येथे ११ तारखेला ही कारवाई केली. दुपारी १ ते सायंकाळी ६:३० या वेळेत बॉयलरमध्ये जाळून साठ्याचे नष्टीकरण करण्यात आले.
सर्वांगीण सुरक्षा आणि निरीक्षण
या प्रक्रियेदरम्यान प्रदूषण आणि सार्वजनिक त्रास टाळण्यासाठी दोन शासकीय पंच, आरोग्य विभाग, अग्निशमन दल, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि रासायनिक तज्ञांची उपस्थिती राखण्यात आली. पोलिस अधीक्षक घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर, उपअधीक्षक दादासाहेब चुडाप्पा यासह विविध विभागांचे अधिकारी येथे हजर होते. सूर्या सेंटरच्या डॉ. मेघना कोरे यांनी तांत्रिक सहकार्य पुरवले.
या ठाण्यांच्या गुन्ह्यांतील मुद्देमाल नष्ट
आष्टा, कुरळप, कुपवाड, कवठेमहांकाळ, सांगली ग्रामीण, उमदी, तासगाव, मिरज शहर, सांगली शहर या नऊ ठाण्यांतर्गत १७ गुन्ह्यांमधील मुद्देमाल या कारवाईत नष्ट करण्यात आला. एनडीपीएस कायद्यानुसार अमली पदार्थाची लागवड, वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी ही मोठी कारवाई महत्त्वाची ठरली आहे.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले, "ड्रग्सच्या विरोधातची ही कारवाई राज्य सरकारच्या निर्णयाचा भाग आहे. सांगलीतून अमली पदार्थाचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही सतत सज्ज आहोत." या यशस्वी ऑपरेशनमुळे जिल्ह्यातील नागरीकांनी पोलिसांबद्दल आत्मविश्वास दाखवला आहे.
0 Comments