राधानगरी (येळवडे) – राधानगरी तालुक्यातील येळवडे गावात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. गावातील विठ्ठल मंदिराजवळ अचानक मेधमाशांनी हल्ला चढवल्याने चार जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.
ही घटना आज सकाळी सुमारे आठ वाजता घडली. सदाशिव लक्ष्मण कूपले (वय 70) हे देवदर्शनासाठी मंदिराजवळ गेले असता नारळीच्या झाडावर असलेल्या मेधमाशांच्या पोळ्यावर काहीतरी हालचाल झाल्यामुळे त्यांनी थेट सदाशिव कूपले यांच्यावर हल्ला चढवला.
त्यांना वाचवण्यासाठी बाबूराव शामराव कूपले (वय 65), आनंदीबाई सदाशिव कूपले (वय 65), व उत्तम सदाशिव कूपले (वय 40) हे धावून गेले, परंतु मेधमाशांनी त्यांच्यावरही हल्ला केला.
जखमींना तात्काळ राशिवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र सदाशिव कूपले यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांच्या पोटावर, डोक्यावर आणि मानेवर गंभीर चावे घेतले गेले आहेत.
घटनेची नोंद सी.पी.आर. पोलिस चौकी येथे करण्यात आली असून, स्थानिक ग्रामस्थांनी मेधमाशांचे पोळे हटविण्याची मागणी केली आहे.
0 Comments