पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक ऋतु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिरज शहरात मोठे यश मिळाले आहे. अनधिकृतरित्या गॅस सिलेंडर वाहतूक व रिफिलिंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश दिल्यानंतर, पोलिसांनी अवैध धंद्यावर धडक कारवाई केली.
पोलिस निरीक्षक सरिता शिंदे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन सावंत व त्यांच्या पथकाने माहितीच्या आधारे तपास सुरू केला. या मोहिमेत त्यांना पोना/अनंत कुडाळकर यांच्याकडून माहिती मिळाली की, अभिनंदन लोहारे नावाचा व्यक्ती बेकायदेशीररीत्या गॅस सिलेंडर साठवून विक्री करीत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळमुत्ताजम गल्ली नं. ५, खोखानगर मालमत्ता रोड, मिरज येथे अभिनंदन लोहारे याचे घर आहे. तपासाच्या दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, त्या ठिकाणी घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणावर साठा आढळून आला. चौकशीत संबंधिताने आपले नाव अभिनंदन विलास लोहारे (वय ३१ वर्षे, रा. बाळमुत्ताजम गल्ली नं. ५, मिरज) असे सांगितले.
तपासादरम्यान घराच्या आत मोठ्या प्रमाणावर घरगुती गॅस सिलेंडर, रेग्युलेटर आणि इतर साहित्य अवैधरीत्या ठेवण्यात आलेले आढळले. सदर ठिकाणी गॅस रिफिलिंगही होत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी सर्व साहित्य जप्त करून अभिनंदन लोहारे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकाने केली असून, पुढील तपासासाठी प्रकरण मिरज शहर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. अधिक तपास सुरू असून, आणखी कोणी या रॅकेटमध्ये सामील आहे का, याचा तपास करण्यात येत आहे.
0 Comments