इगतपुरी (जि. नाशिक) – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व सिटू (CITU) यांच्या वतीने इगतपुरी तहसील कार्यालयावर कामगार व शेतकरी हक्कांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये कामगार विरोधी चार लेबर कोड, तसेच लोकशाही अधिकारांवर गदा आणणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाचा तीव्र निषेध करण्यात आला.
या आंदोलनात स्मार्ट मीटरच्या लादणीविरोधात तीव्र नाराजी, तसेच टाकेघोटी येथील चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या अंडर बायपास कामास विरोध व्यक्त करत, गावकरी व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बायपासचे काम करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
मुंडेगाव रेल्वे पुलाखालील बंद रस्त्याची दुरुस्ती, मुरंबी, येलदरावाडी, व मुंडेगावच्या रस्त्यांचे Forest विभागाकडून परवानगी घेऊन काम सुरू करणे, तसेच कातकरी व आदिवासी समाजासाठी मंजूर घरकुल योजनेत वनजमिनीवरील परवानगी मिळवून त्वरित बांधकाम सुरू करणे, या मागण्याही मांडण्यात आल्या.
नांदडगाव व मुकणे गावांतील लाईट, रस्ते व पाणी प्रश्न त्वरित सोडवणे, इगतपुरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करणे, तसेच गरजू लाभार्थ्यांना डावलून बोगस लाभार्थ्यांना घरकुल देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार योजनेतील कर्मचाऱ्यांना किमान वेतन ₹२६,००० मिळावे, तसेच बांधकाम कामगारांची बंद असलेली ऑनलाईन नोंदणी पुन्हा सुरू करून त्यांना मंडळाचे लाभ मिळावेत, यासाठीही मोर्चादरम्यान आवाज उठवण्यात आला.
0 Comments