मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चेला वेग आला असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मामा चंदूमामा यांनी या घडामोडींवर भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचे वक्तव्य ऐकून मला आनंद झाला आहे. मी समाधानी आहे. जर हे दोघे आता एकत्र येत असतील, तर लेट बेटर दॅन नेव्हर – झालं गेलं गंगेला मिळालं. मने एकत्र येत असतील, तर हे महाराष्ट्रासाठी चांगलेच आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले.
उद्धव ठाकरे यांच्या अटी-शर्तींवरही चंदूमामांनी मत व्यक्त करत सांगितले, “त्यालाही पर्याय आहे. आपण शुभ बोलू. तुळजाभवानी चरणी प्रार्थना आहे की महाराष्ट्राला चांगले दिवस लवकरच येतील.”
चंदूमामा पुढे म्हणाले, “कोण मुख्यमंत्री होईल किंवा सत्तेवर कोण येईल, यामध्ये मी पडणार नाही. पण जे होईल ते मराठी माणसाच्या हिताचेच व्हावे अशी अपेक्षा आहे. युती का होत नाही याचं मुख्य कारण समज-गैरसमज आहेत. पण आता दोघेही चिल्लर गोष्टी बाजूला ठेवायला तयार आहेत हे आनंददायक आहे.”
भावनिक स्वरात बोलताना त्यांनी सांगितले की, “साहेबांना यामुळे शांतता मिळेल. सूर्यप्रकाशाची अंधुक किरणं दिसू लागली आहेत. लवकरच सूर्य उगवेल अशी आशा आहे.”
“मामाला दोन भाचे भांडताना पाहणं आवडत नाही. काही भावना शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाहीत, त्या बॉडी लँग्वेजमधून उमगतात. माझ्या पुस्तकात नवीन बॉम्ब नसतील पण आठवणींचे उजळे असतील. साहेबांनी माझ्यावर किती प्रेम केलं, हे मी पाहिलं आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
आपल्या खास शैलीत चंदूमामा म्हणाले, “हटाव लुंगी आंदोलन सुरू असताना मी एका दाक्षिणात्य मुलीसोबत लग्न केलं. साहेबांनी माझ्या लग्नासाठी आशीर्वाद दिला. आमच्या माँ साहेब आणि मराठी जनतेच्या आशीर्वादानेच हे सगळं शक्य झालं आहे.”
0 Comments