पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या उपक्रमांचे भरभरून कौतुक करत महिलांच्या उत्पादनांना ब्रँडिंग करून जिल्ह्याची एक नवी ओळख तयार करण्याचे आवाहन केले आहे.
सांगली, दि. 7 (जि. मा. का.) : “उमेद” या उपक्रमांतर्गत महिला बचतगटांकडून उत्पादित होणाऱ्या वस्तूंना डिजिटल माध्यमातून प्रसिद्धी मिळवून देत त्यांचे ब्रँडिंग करावे, आणि त्या माध्यमातून जिल्ह्याची एक ओळख निर्माण करावी, असे प्रतिपादन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
राज्य शासनाच्या ‘100 दिवस कृती आराखड्यां’ अंतर्गत सांगली जिल्हा परिषदेच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन आणि आढावा बैठकीत ते बोलत होते.
या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले की, “सोशल मीडिया, पोर्टल, डिजीटल प्लॅटफॉर्म यांचा वापर करून उमेद गटांनी आपली उत्पादने लोकांपर्यंत पोहचवावी. ब्रँड तयार करून त्या उत्पादनांची बाजारपेठ विस्तारली पाहिजे.”
या कार्यक्रमात जिल्हा परिषदेने “उमेद, जटायू आणि वरदान” ही तीन डिजीटल पोर्टल्स सुरु केली. ‘उमेद’ पोर्टल महिला बचतगटांच्या उत्पादने व सेवांसाठी, ‘जटायू’ हे अमली पदार्थविरोधी प्रबोधनासाठी तर ‘वरदान’ हे CSR निधीसाठी वापरण्यात येणार आहे.
‘माझ्या गावचा धडा’, ‘दिविजा योजना’, ड्रोनद्वारे औषध फवारणी, तंबाखूमुक्त शाळा जिल्हा, अशा विविध नाविन्यपूर्ण संकल्पनांचे पालकमंत्र्यांनी कौतुक करत सांगली जिल्ह्याने राज्यात आदर्श ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
नवीन कल्पना, डिजीटल माध्यमांचा योग्य वापर आणि स्थानिक उत्पादकतेला चालना देणारे हे उपक्रम जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहेत, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
#सांगली_बातमी
#उमेदउपक्रम
#चंद्रकांतपाटील
#जिल्हा_परिषद_सांगली
#ब्रँडिंग
#महिला_सक्षमीकरण
#डिजीटल_मीडिया
#CSR_उपक्रम
0 Comments