यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील रिसेप्शनच्या फोटोग्राफीचा कार्यक्रम आटोपून माहूरकडे जात असलेल्या फोटोग्राफरच्या स्कुटीला पाठीमागून आलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीने धडक देऊन खाली पाडत गाडीतील चार अज्ञात लुटारूंनी बंदूक आणि चाकूच्या धाकावर फोटोग्राफरचा कॅमेरा आणि इतर साहित्य असा दीड लाख रुपयांच्या ऐवजासह लुटल्याची थरारक आणि खळबळजनक वाटमारीची सिनेस्टाईल घटना महागाव तालुक्यातील शिरपूर गावालगत असलेल्या पुलावर शनिवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. याबाबत फिर्यादी शेख तनवीर शेख हरून व्यवसाय फोटोग्राफर राहणार माहूर जिल्हा नांदेड यांनी महागाव पोलिसात रविवारी ११मे रोजी सकाळी दाखल केलेल्या तक्रारीवरून अज्ञात ४ आरोपींविरुद्ध वाटमारीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
या घटनेची हकीकत अशी की, पुसद येथील असलम खान यांच्या घरी शनिवार १० मे रोजी सायंकाळी ६ वाजता रिसेप्शनचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाची फोटोग्राफी करण्यासाठी माहूर येथील फोटोग्राफर शेख तनवीर शेख हरून (२५) आणि त्याचा मित्र सय्यद राजीक सय्यद अनिस हे दोघे गेले होते. कार्यक्रम आटोपून हे दोघे स्कुटी ने माहूरकडे परत जात होते. दरम्यान गुंज पासून पुढे निघाल्यानंतर महागाव तालुक्यातील शिरपूर येथील पुलाजवळ पाठीमागून आलेल्या स्विफ्ट डिझायर या वाहनाने स्कुटीला धडक दिली. या धडकेत स्कुटी वरील शेख तनवीर आणि सय्यद राजिक हे दोघेही खाली पडले. यावेळी स्विफ्ट डिझायर गाडीतून दोन अज्ञात इसम खाली उतरले, त्यांच्याकडे बंदुक आणि धारदार चाकू सारखे शस्त्र होते. बंदुक आणि शस्त्राचा धाक दाखवत या अज्ञात लुटारूंनी शेख तनवीर यांच्या हातातील सोनी कंपनीचा महागडा कॅमेरा व जुन्या सेट अपचे साहित्य हे सर्व हिसकावून घेतले. यावेळी आणखी दोघे जण स्विफ्ट डिझायर मध्ये बसून होते. फोटोग्राफर शेख तनवीर आणि सय्यद राजिक यांना धमकावत हे सर्व अज्ञात लुटारू स्विफ्ट डिझायर या वाहनाने पुसदच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाले. रात्री उशिरा शेख तनवीर याने महागाव पोलीस स्टेशन गाठून या घटनेची फिर्याद दाखल केली, त्यानंतर महागाव पोलिसांनी चार अज्ञात आरोपीविरोधात वाटमारीचे गुन्हे दाखल केले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद सरकाटे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
ऐण रहदारीच्या रस्त्यावर ही वाटमारीची गंभीर घटना घडल्यामुळे चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला नसल्याचे अधोरेखित होत असले तरी,
पोलिस प्रशासनाच्या देखील काही मर्यादा आहेत. नागरिकांचीदेखील स्वसंरक्षणाची तेवढीच जबाबदारी आहे.त्यामुळे नागरिकांनी रात्रीअपरात्री उशिरा निदान दुचाकीवरून तरी प्रवास करणे टाळलेलेच बरे,असेच या वाटमारीच्या घटनेनंतर म्हणावे लागेल.
0 Comments