अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित दीपोत्सव कार्यक्रमात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महत्त्वपूर्ण मागणी मांडली आहे. त्यांनी सांगितले की, दिल्लीतील राष्ट्रपती भवन आणि रायसोनी गावाची जागा ही होळकर घराण्याची असून, या ऐतिहासिक ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारले जावे, यासाठी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करणार आहोत.
या कार्यक्रमात बोलताना पडळकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विशेष कौतुक केले. "प्रथमच धनगर वाड्याच्या बाहेर अहिल्यादेवींची जयंती देशभर साजरी केली जात आहे. हे श्रेय संघालाच जाते," असे तोंडभरून कौतुक त्यांनी केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, दिल्लीमध्ये मराठा सरदारांचा मोठा दबदबा होता. मल्हारराव होळकर यांचे नाव ऐकल्यावर दिल्ली थरथर कापत होती. त्यामुळे अशा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये अहिल्याबाईंचे स्मारक उभे राहणे गरजेचे आहे.
पडळकर यांनी असेही स्पष्ट केले की, देशातील विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांना देखील अहिल्यादेवींच्या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे, आणि यामागे संघाचा समन्वय आहे.
त्यांनी यावेळी आणखी एक महत्त्वाची घोषणा करत सांगितले की, देशभर कुठेही नसलेले मल्हारराव होळकर यांचेही स्मारक उभारावे, यासाठी देखील आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी मागणी करणार आहोत.
या संपूर्ण घडामोडींमुळे धनगर समाजातील भावना ऐतिहासिक महापुरुषांच्या स्मृतीप्रती जागृत होताना दिसत आहे, आणि या मागण्यांमागे पडळकर यांचा आग्रही पुढाकार दिसून येतो आहे.
0 Comments