मगरे पिंपळकौठा (ता. मुदखेड) या गावात २७ एकर क्षेत्रात उभारल्या जात असलेल्या “अनुसया बाई शावजी ढगे पाटील गूळ पावडर व खांडसरी साखर कारखान्याच्या” यंत्र पूजनाचा व सत्यनारायण पूजनाचा कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात पार पडला.
या कारखान्याच्या संकल्पनेचे जनक उद्योजक दादाराव पाटील ढगे असून त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी या महत्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी सुरू केली आहे. यंत्रपूजन व पूजन विधी गुरुवर्य दयाळगिरी महाराज यांच्या हस्ते, तसेच अनुसया ढगे व दादाराव ढगे यांच्या उपस्थितीत पार पडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. नागेश पाटील आष्टीकर होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये प्रणिता देवरे चिखलीकर, शिरीष गोरठेकर (राष्ट्रवादी - शरद पवार गट), बाळासाहेब पाटील रावनगांवकर (राष्ट्रवादी - अजित पवार गट), तिरुपती पाटील कोंडेकर (काँग्रेस), प्रवीण गायकवाड (भाजप), प्रताप देशमुख बारडकर (काँग्रेस), प्रकाशराव भोसीकर (माजी सभापती), बबन बारसे (शिवसेना जिल्हा प्रमुख) यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
उद्योजक दादाराव ढगे यांनी आपल्या प्रास्ताविकात कारखान्याविषयी सविस्तर माहिती दिली. "या कारखान्याद्वारे शेतकऱ्यांच्या ऊसाला न्याय मिळेल. सभासदांचा ऊस बारा महिन्यांत उचलला जाईल व शेअर्स नोंदणीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे," असे त्यांनी नमूद केले.
पहिला सभासद नोंदणीचा मान गोपाळराव देशमुख चिकाळेकर यांना मिळाला.
प्रणिता देवरे, शिरीष गोरठेकर, बाळासाहेब रावनगावकर, प्रा. संदीप देशमुख बारडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "या भागात एकाधिकारशाहीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण होत होते. पण आता दादाराव ढगे यांच्या कारखान्यामुळे ही स्थिती बदलेल."
या कार्यक्रमास पिंटू पाटील वासरीकर, सदाशिवराव देशमुख, गोविंद गोपानपल्ले, विलासराव गव्हाणे, जनार्धन शिंदे, दादाराव पुयड नागेलीकर, शरद पवार, महेश पवार, बळवंत पाटील, पत्रकार अतिक अहेमद, धम्मा कांबळे, तसेच पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
हा कारखाना ऊस उत्पादकांसाठी नवीन युगाची सुरुवात ठरणार आहे, असे मत बहुतेक वक्त्यांनी एकमुखाने व्यक्त केले.
0 Comments