भोकर विधानसभा मतदारसंघातील पिंपळकौठा (ता. मुदखेड) येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या 'अनुसया शावजी ढगे गूळ पावडर व खांडसरी साखर कारखान्याचे यंत्रपूजन आणि सत्यनारायण पूजन विधी' दिमाखात पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खा. नागेश पाटील आष्टीकर होते. यावेळी उद्योजक दादाराव पाटील ढगे, अनुसयाबाई ढगे, तसेच अनेक मान्यवर व पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.
या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक नवा आधार व न्याय मिळणार असून, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या एकाधिकारशाहीला पर्याय निर्माण होणार असल्याची स्पष्ट चर्चा शेतकरी वर्गात ऐकायला मिळाली.
प्रगतिपथावर असलेला हा कारखाना दररोज ३,००० मे.टन ऊस गाळपाची क्षमता बाळगतो. त्यामुळे याआधी गाळपासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना आता विश्रांतीचा आणि दिलास्याचा श्वास घेता येणार आहे.
दादाराव ढगे यांनी सांगितले की, "शेअरधारक शेतकऱ्यांना ५० किलो गूळ विनामूल्य दिला जाणार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहोत." तसेच प्रणिती देवरे चिखलीकर यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, "या भागात भीतीचं वातावरण कायम होतं, पण आता हा कारखाना नवसंजीवनी ठरेल."
कार्यक्रमात शिरीष गोरठेकर यांनी मत व्यक्त करताना म्हटले की, "सवत निर्माण झाल्यावरच एकाधिकारशाही संपते, आणि हे कारखानं त्या दिशेने पहिलं पाऊल आहे." तसेच प्रा. संदीपकुमार देशमुख बारडकर यांनी हा कारखाना म्हणजे "शेतकऱ्यांसाठी आशेचा सूर्यकिरण आहे," असे म्हटले.
तिरुपती कोंडेकर, बाळासाहेब रावणगावकर यांच्यासह अनेक मान्यवरांनीही शेतकऱ्यांच्या शोषणाला थांबा लागेल, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी परिसरातील शेकडो ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
0 Comments