सांगली, दि. १ (जि. मा. का.) – मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वसतिगृहांचे आधुनिकीकरण हे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे केले.
मिरज व सांगली येथील गुणवंत मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह यांच्या नूतन इमारतींच्या उद्घाटन व लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री व आमदार डॉ. सुरेश खाडे, बार्टीचे महासंचालक सुरेश वारे, प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर व समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त मेघराज भाते आदी मान्यवर उपस्थित होते.
शिरसाट म्हणाले, वसतिगृहांमधून खऱ्या अर्थाने देशाचे भविष्य घडते. यासाठी राज्य शासनाने १२५ वसतिगृहांसाठी १,२०० कोटी रुपयांची तरतूद केली असून, ती सर्व वसतिगृहे थ्री स्टार दर्जाच्या करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणासोबत निवास, आहार, स्वच्छता आणि सुरक्षितता यामध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, याकडे शासन कटाक्ष ठेवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. सुरेश खाडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शासकीय वसतिगृहांच्या उभारणीमुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिक्षणात योगदान वाढेल. जिल्ह्यातील काही वसतिगृहे अजूनही खाजगी जागेत आहेत, त्यांना शासकीय जागा मिळवून देण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर मंत्री शिरसाट यांच्या हस्ते दोन्ही वसतिगृहांचे उद्घाटन झाले.
0 Comments