"१३ वर्षांच्या मुलीचा एका दिवसात दोनदा विवाह!"
बीड : बीड शहरातील शिवाजीनगर परिसरातून धक्कादायक आणि थरारक बालविवाह प्रकरण समोर आलं आहे. अवघ्या १३ वर्षांच्या पाचवीत शिकणाऱ्या मुलीचं एका दिवसात दोन वेळा लग्न लावण्यात आलं. ही धक्कादायक घटना उघड झाल्यानंतर संपूर्ण बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
ही मुलगी सोमवारपासून सहावीच्या वर्गात जाण्याची तयारी करत होती. मात्र तिच्या वडिलांनी आणि सावत्र आईने तिचं बालपण हिरावून घेत तिचं लग्न लावून दिलं. सुरुवातीला तिचं लग्न एका ३०-३५ वर्षाच्या, आधीच दोन मुलांचा बाप असलेल्या व्यक्तीसोबत घरातच लावण्यात आलं. लग्नानंतर त्यांचे फोटोही काढण्यात आले.
परंतु या व्यक्तीच्या पत्नीला जेव्हा ही बाब समजली, तेव्हा तिने थेट शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस कारवाईच्या भीतीने पहिला नवरा पळून गेला. त्यानंतर लगेचच त्या व्यक्तीने आपल्या बहिणीच्या गावातील एका तरुणास त्या मुलीशी लग्न लावण्यास सांगितले. अवघ्या काही तासांतच दुसरं लग्नही पार पडले. दोघांचे फोटो काढण्यात आले आणि तो मुलगा ती मुलगी घेऊन निघाला.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मुलीचा अपहरण होताना रोखलं आणि त्या तरुणाला ताब्यात घेतलं.
या संपूर्ण प्रकरणात शाहूनगर पोलिसांनी गंभीर दखल घेत बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत काझीसह एकूण २२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पहिला नवरा अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. नागरिकांतून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
0 Comments