"मिरजमध्ये कुंटणखान्यावर छापा – पीडितेची सुटका, एक महिला अटकेत"
मिरज (जि. सांगली) : मिरज शहरातील प्रेमनगर परिसरात वेश्या व्यवसाय चालवल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकत एका पीडित महिलेला ताब्यात घेतले असून, एक महिलेला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मिरज परिसरात खळबळ उडाली आहे.
सांगलीचे मा. पोलीस अधीक्षक यांनी जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलल्या जाणाऱ्या महिलांची माहिती मिळवून कारवाईचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानुसार फ्रिडम फर्म या सामाजिक संस्थेकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, रेणुका शांता कांबळे (वय ३५, रा. प्रेमनगर, उत्तमनगर, मिरज) ही महिला तिच्या मालकीच्या दुमजली इमारतीच्या खालच्या मजल्यावर असलेल्या रूम्स वेश्या व्यवसायासाठी भाड्याने देत असल्याचे निष्पन्न झाले.
याच ठिकाणी सीमा उर्फ ज्योती मुखर्जी ही महिला गिऱ्हाईकांच्या मागणीनुसार महिलांची उपलब्धता करून देत असल्याचेही स्पष्ट झाले. ही दोघी मिळून वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आपला उदरनिर्वाह करत होत्या.
वरील माहितीच्या आधारावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार प्रेमनगर येथे पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक पाठवून सापळा रचला. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत एक पीडित महिला ताब्यात घेतली व तिला सुरक्षित ठिकाणी हलवले. याप्रकरणात घरमालकीण रेणुका कांबळे हिला अटक करण्यात आली असून, एजंट म्हणून कार्यरत असलेली सीमा उर्फ ज्योती मुखर्जी ही फरार आहे.
या प्रकरणी महात्मा गांधी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
0 Comments