“प्रती दिंडी ₹20,000; शासनाचा वारीसाठी मोठा निर्णय”
पंढरपूर : आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले असून, या श्रद्धेच्या सोहळ्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचे अनुदान देण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. एकूण 2 कोटी 21 लाख 80 हजार रुपये इतका निधी सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे.
या निर्णयाचा शासन निर्णयदेखील प्रसिद्ध करण्यात आला असून, 2024 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ही शिफारस करण्यात आली होती. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत हे अनुदान वितरित करण्यात येणार आहे.
गतवर्षीप्रमाणे यंदाही विभागीय आयुक्तांनी 1109 दिंड्यांची यादी शासनाला सादर केली होती. त्यानुसार हे अनुदान दिले जाणार आहे. या निर्णयामुळे वारकऱ्यांना आर्थिक मदतीसह त्यांच्या यात्रा खर्चात दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी ‘चरणसेवा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या वतीने राज्यातील नाशिक, जालना, सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतून निघालेल्या पालख्यांमध्ये 5,000 हून अधिक वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, पॅरामेडिकल स्टाफ आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वारकऱ्यांसाठी 43 ठिकाणी मुक्कामस्थळांची व्यवस्था करण्यात आली असून, तेथे सुसज्ज वैद्यकीय तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्थांचा यामध्ये समन्वय साधण्यात आला आहे.
6 जुलै रोजी पंढरपूर येथे मुख्य वारी सोहळा पार पडणार असून, सुरळीत आणि सुरक्षित वारीसाठी 6,000 पोलीस कर्मचारी, 3,200 होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या 6 तुकड्यांची तैनाती करण्यात आली आहे. संपूर्ण पालखी मार्गावर ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवण्यात येणार असून पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली आहे.
0 Comments