वसंतदादांच्या वारशाला भाजपचा हातभार; जयश्रीताईंचा राजकीय यु-टर्न
वसंतदादांच्या राजकीय वारशातून भाजपमध्ये कोणीच येत नव्हते, हे शल्य अखेर संपले आहे. जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सांगलीतील राजकीय समीकरणेच बदलून टाकली आहेत.
भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत जयश्रीताईंनी भाजपमध्ये प्रवेश केला. दादांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले, “वसंतदादांच्या घराण्यातील कोणीही आमच्या पक्षात येत नव्हते, ते शल्य आज दूर झालं आहे.”
सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयश्रीताईंचा हा निर्णय भाजपसाठी मोठा बूस्टर ठरू शकतो. विशेष म्हणजे काही काळापूर्वी जयश्रीताई अजित पवारांच्या गटात सामील होण्याच्या तयारीत होत्या, मात्र राजकीय समीकरणे बदलताच त्यांनी यु-टर्न घेतला आहे.
विजय बंगला येथे झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या स्वागत कार्यक्रमात जयश्रीताईंनी सांगितले की, “वसंतदादा बँकेच्या अडचणी सोडवण्यासाठी भाजपच सक्षम असून विकासाची दिशा ठरवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.”
या प्रवेशामुळे भाजपच्या सांगलीतील गोटात चैतन्य संचारले असून महापालिकेतील सत्ता समीकरणांवर याचा मोठा परिणाम होणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
0 Comments