सांगली शहरातील विजयनगरमधील शाहूनगर येथे पतीने पत्नीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चरित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून तिचा खून केला. सदर प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित पती फरार आहे.
मृत महिलेचे नाव शीलवंती पिंटू पाटील (वय 40, मुळ रा. हुलजंती, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे आहे. तर संशयित पतीचे नाव पिंटू तुकाराम पाटील (वय 36) असे आहे. हे दाम्पत्य मजुरीसाठी काही महिन्यांपासून सांगलीतील शाहूनगर, विजयनगर परिसरात राहत होते. त्यांना नऊ आणि सात वर्षांची दोन मुले आहेत.
सदरील प्रकरणात पती पिंटू हा शीलवंतीलाच सातत्याने चरित्र्याच्या संशयाखाली त्रास देत होता. मंगळवारी रात्री त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि शीलवंती झोपल्यानंतर पिंटूने तिच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली असताना पिंटूने मुलांना घेऊन घरातून पलायन केले.
बुधवारी शेजाऱ्यांच्या माध्यमातून घटनेची माहिती संजयनगर पोलीस ठाण्याला मिळताच पोलीस निरीक्षक सूरज बिजली व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचा तपास सुरू असून, संशयित पती पिंटू पाटील याच्या शोधासाठी सोलापूर जिल्ह्यात पथके रवाना करण्यात आली आहेत.
0 Comments