केंद्र सरकारने अश्लील व लैंगिक स्वरूपाचा कंटेंट प्रदर्शित करणाऱ्या 25 ओटीटी अॅप्सवर थेट बंदी घातली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला (MeitY) नागरिक व विविध सामाजिक संघटनांकडून सातत्याने तक्रारी मिळत होत्या. या तक्रारींच्या चौकशीनंतर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
सरकारी तपासणीत स्पष्ट झाले की, उल्लू, ALTT (ALT Balaji), Desiflix, Big Shots यांसारख्या अनेक अॅप्सवर 'कामुक वेब सिरीज'च्या नावाखाली अश्लील कंटेंट खुलेआम प्रदर्शित केला जात होता. हे अॅप्स IT नियम 2021 आणि IPC कलम 292/293 चं सर्रास उल्लंघन करत होते.
भारतीय कायद्यानुसार, असे सर्व डिजिटल कंटेंट जे सार्वजनिक नैतिकतेला धक्का पोहोचवतात आणि अल्पवयीन मुलांसाठी सुलभतेने उपलब्ध होतात, त्यांना अश्लील मानले जाते. IT Act चं कलम 67 आणि 67A, तसेच POCSO कायद्यानुसार बाल लैंगिक शोषणाशी संबंधित डिजिटल कंटेंटवर कठोर शिक्षा होऊ शकते.
स्वनियमनाचा अधिकार दिला असतानाही काही ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी याचा गैरवापर करत कायद्याचे उल्लंघन केले. त्यामुळे सरकारने थेट हस्तक्षेप करत या अॅप्सवर बंदीचा निर्णय घेतला.
राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी संसदेत सांगितले की, जानेवारी 2022 ते जून 2025 दरम्यान केंद्र सरकारने 1,524 ऑनलाईन जुगार, सट्टेबाजी व गेमिंग संबंधित वेबसाइट्स आणि अॅप्सवर बंदी घातली आहे.
या निर्णयामुळे डिजिटल माध्यमात नैतिकतेचा समतोल राखण्याचा सरकारचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो.
0 Comments