राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील युवा उद्योजक सचिन वसंतराव ठुबे यांनी नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
सचिन ठुबे यांची ब्राह्मणी गावात शनिशिंगणापूर-राहुरी रोडलगत "ग्रीन अप् फार्मर प्रोड्यूसर कंपनी" होती. या कंपनीच्या माध्यमातून ते स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. कोरोनानंतर त्यांना म्युकर मायक्रोसिससारखा गंभीर आजार झाला होता. या आजाराच्या उपचारासाठी मोठा आर्थिक खर्च झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु आजारातून सावरल्यानंतर त्यांनी पुन्हा उमेदीने आपली कंपनी पुर्ववत सुरू केली होती.
त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अन्य नेत्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान देखील झाला होता. समाजाशी एकरूप होऊन, नेहमी सकारात्मक राहणाऱ्या सचिन यांनी अचानक असे टोकाचे पाऊल का उचलले? हा प्रश्न अनेकांच्या मनात घोंगावत आहे.
सचिन यांना कोणी मानसिक त्रास देत होते का? याचा तपास होणे गरजेचे असून, या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सचिन ठुबे यांचा मित्रपरिवार मोठा होता. ते सर्वांशी अत्यंत प्रेमळपणे वागत असत. त्यांच्या जाण्याने मित्र, कुटुंबीय व ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर ब्राह्मणी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 Comments