अंकलखोप (ता. पलूस) येथे मंगळवारी (दि. १) कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा मगरीच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बुधवारी (दि. २) भिलवडी येथील हाळभाग परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. मृत युवकाचे नाव अजित अनिल गायकवाड (वय ३२) असे आहे.
अजित गायकवाड हा मंगळवारी दुपारी १ वाजता कृष्णा नदीवर पोहण्यासाठी गेला होता. मात्र, संध्याकाळपर्यंत तो घरी परतला नाही. घरच्यांनी गावभर शोध घेतला, पण तो सापडला नाही. बुधवारी सकाळी गावातील काही नागरिक पोहण्यासाठी नदीवर गेले असता, त्यांना काठावर अजितचे कपडे आणि चप्पल आढळून आले. त्यांनी तातडीने घरच्यांना कळवले. अजितचे कुटुंबीय व गावकऱ्यांनी त्याच्या हरविल्याची तक्रार भिलवडी पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली.
घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिस, वनविभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थांनी मिळून शोध मोहीम हाती घेतली. नितीन गुरव यांच्या मदतीने बोटीद्वारे नदीपात्रात शोध घेत असताना सायंकाळी ४:१५ च्या सुमारास भिलवडीच्या हाळभाग परिसरात अजितचा मृतदेह झुडपात तरंगताना आढळला. प्राथमिक तपासानुसार त्याच्या मृत्यूला मगरीचा हल्ला कारणीभूत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
अजित गायकवाड हा औदुंबर येथील दत्त देवस्थान समितीमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होता. त्याच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. वन क्षेत्रपाल संतोष शिरसाटवार, वनपाल सुजित गवते, वनपाल सुरेखा लोहार, सहायक पोलिस निरीक्षक के. बी. हारुगडे, पोलिस हवालदार सुनील सूर्यवंशी, स्वप्नील शिंदे आणि चार होमगार्ड यांनी या शोध मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.
अंकलखोप परिसरातील कृष्णा नदी पात्रात याआधीही मगरीच्या हालचाली दिसून आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे. या घटनेने गावात भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
0 Comments