श्रीगोंदा (अहमदनगर) – श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव येथे आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. घरात पाणी टाकून स्वच्छता करत असताना विजेचा धक्का बसून मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
या दुर्घटनेत राजेंद्र हिरामण लोंढे (वय ४९) आणि सखुबाई हिरामण लोंढे (वय ६५) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सध्या गावात यात्रोत्सवाचे वातावरण असून घराघरात साफसफाई सुरू आहे. लोंढे कुटुंबियांच्या घरातही साफसफाई सुरू होती. घराच्या लोखंडी दरवाजावरून वीजजोडणीसाठी वायर मीटरमध्ये जोडलेली होती. ही वायर खराब अवस्थेत होती व त्यामुळे वीजप्रवाह थेट पाण्यात उतरला.
पाण्यात उभे असताना राजेंद्र लोंढे यांना विजेचा तीव्र धक्का बसला. त्यांनी जीवाच्या आकांताने आवाज दिला. आवाज ऐकून त्यांची आई सखुबाई लोंढे धावत आल्या आणि मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांनाही विजेचा धक्का बसला. या हृदयद्रावक घटनेत मायलेकाचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेने चांडगाव गावात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.
0 Comments