गोंदिया तालुक्यातील अदासी गावात सुरु असलेल्या ‘वाइन वर्ल्ड बिअर बार’ला बंद करण्यासाठी काल गावात विशेष महिला ग्रामसभा घेण्यात आली. विशेष म्हणजे, गावातील ११२० महिलांपैकी तब्बल ७८८ महिलांनी बार बंद करण्याच्या बाजूने मतदान करत एकसंघ भूमिका मांडली.
ही संपूर्ण प्रक्रिया राज्य उत्पादन शुल्क विभाग व जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीखाली पार पडली. महिलांच्या या निर्धारामुळे लवकरच गावातील बिअर बार बंद होईल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
याआधी २६ जानेवारी २०२५ रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत बिअर बार बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. यानंतर १० मार्च २०२५ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ग्रामपंचायतीला विशेष ग्रामसभा घेण्याचे पत्राद्वारे सुचवले.
त्याअनुषंगाने १९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या आवारात विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या वेळी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत, बिअर बार विरोधी मत नोंदवले.
विशेष ग्रामसभेतील मतदानाचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही करण्यात आले असून बहुमताने ठराव पास करण्यात आला आहे. आता पुढील निर्णय राज्य उत्पादन अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर अपेक्षित असून गावकऱ्यांनी त्यांच्या निर्णयाकडे उत्सुकतेने पाहणे सुरू केले आहे.
या स्तुत्य उपक्रमामुळे गावातील महिलांचे एकजूट व सामाजिक सजगतेचे दर्शन घडले आहे. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत करत दारूबंदीच्या दिशेने टाकलेले हे पाऊल प्रेरणादायी ठरेल, असे मत व्यक्त केले आहे.
0 Comments