सांगलीच्या संजयनगर परिसरात खळबळजनक घटना समोर आली असून, साखर व्यापारी विक्रम दिनकर पाटील (वय ४०) यांच्या घरासमोर उभी असलेली मोटार तिघा अनोळखी व्यक्तींनी काठीने फोडली. या घटनेमागे खंडणी मागणी आणि जुन्या खटल्याचा वाद असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादी विक्रम पाटील यांनी संजयनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्याकडे अलीकडेच साखर निर्यातीचा एक मोठा ठेका आला आहे. या ठेक्याची माहिती पुण्यातील एका नेत्याच्या भावाला मिळाल्यानंतर, त्याने खंडणीसाठी संपर्क साधायला सुरुवात केली.
सुरुवातीला फोनवर धमक्या, नंतर घरावर लोक पाठवून दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक दिवस स्वतः तो पुण्यातील नेत्याचा भाऊ पाटील यांच्या घरी आला आणि त्यांच्यात वाद झाला. या वादाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग विक्रम पाटील यांनी पोलिसांना सादर केले आहे.
या घटनेनंतर तिघा अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या घरासमोर उभी असलेली मोटार काठीने फोडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे.
मोटार फोडणाऱ्यांनी घटनास्थळी धमकी दिली होती – "तू रणजित जाधव यांच्या विरोधातील खटला मागे घे. तुला इचलकरंजीला बोलावले आहे. तुला सोडणार नाही," असे ते म्हणाले, असा आरोप पाटील यांनी तक्रारीत केला आहे.
या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी तिघा अनोळखींविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
0 Comments