गोंदिया जिल्हा पोलीस विभागाने नागरिकांसाठी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. आता नागरिकांना पोलीस स्टेशनमधील त्यांच्या अनुभवाचा फिडबॅक थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांपर्यंत पोहोचवता येणार आहे. यासाठी सिटीझन फिडबॅक प्रणाली सुरु करण्यात आली असून, जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन व शाखांमध्ये क्यूआर कोड स्कॅन करून नागरिक अभिप्राय देऊ शकणार आहेत.
पोलीस सेवा - आता नागरिकांच्या फिडबॅकवर आधारित
पोलिस स्टेशनमध्ये तक्रार, चौकशी किंवा अन्य कोणतेही काम घेऊन गेलेल्या नागरिकांचा अनुभव काय होता? पोलिसांनी योग्य प्रतिसाद दिला का? हे सर्व जाणून घेण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. नागरिकांना वागणूक, तत्परता, न्याय्य व्यवहार या बाबतीत आपली मते, अभिप्राय नोंदवता येणार आहे.
फिडबॅक स्कॅन करा – थेट वरिष्ठांपर्यंत पोहचा
प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये आता QR कोड असलेले बॅनर लावण्यात आले असून, ते स्कॅन करून मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत फिडबॅक देता येतो. यामध्ये तक्रार नोंद झाली की नाही, वेळेवर मदत मिळाली की नाही, याचा नागरिक उल्लेख करू शकतात. या अभिप्रायाचे परीक्षण उपविभागीय पोलीस अधिकारी, अपर पोलिस अधीक्षक तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक स्वतः करतील.
नागरिक सहभागातून सुधारणा – एक सकारात्मक वाटचाल
या उपक्रमातून पोलिस प्रशासन अधिक पारदर्शक, जबाबदार आणि नागरिकाभिमुख होईल, अशी अपेक्षा आहे. या माध्यमातून मिळणाऱ्या प्रतिक्रिया भविष्यातील सेवा सुधारण्यात मोलाची भूमिका बजावतील.
पोलिस अधीक्षकांचे आवाहन
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, "पोलिस विभागाशी संबंधित अनुभव, तक्रारी आणि समाधान याबाबत प्रामाणिक फिडबॅक द्या, जेणेकरून सेवा अधिक चांगली व नागरिकाभिमुख करता येईल."
0 Comments