सांगली | २८ मे २०२५ – पंचकल्याण महोत्सवात झालेल्या गर्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे अडीच तोळ्याचे गंठण चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी उत्कृष्ट तपास करत चार महिला आरोपींना अटक केली असून, चोरी गेलेला सोन्याचा ऐवजही हस्तगत करण्यात आला आहे.
ही घटना ८ मे २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास दुधगाव (ता. मिरज) येथे घडली होती. फिर्यादी शकुंतला शशिकांत पाटील या महोत्सवाच्या जेवण विभागात असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील गंठण चोरले होते. पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे व उपविभागीय अधिकारी श्रीमती विमला एम. (भा.पो.से.) तसेच दादासाहेब चुडाप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली. पोउनि गैतम सोनकांबळे, सपोफौ मेघराज रुपनर, पो.नाईक अभिजीत पाटील, बंडू पवार, सचिन कोळी व महिला पो.अं. मनिषा कोरे यांचा या कारवाईत महत्त्वाचा सहभाग होता.
गोपनीय माहितीच्या आधारे बुधगाव हायस्कूलजवळ संशयित महिला सोन्याचा दागिना विक्रीसाठी येणार असल्याचे समजताच, पोलिसांनी सापळा रचत चार महिलांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे अशी आहेत:
सौ. लक्ष्मी बाळू सकट, रा. राजेंद्र नगर, कोल्हापूर
सौ. दिपाली किशोर काळे, रा. जयसिंगपूर, कोल्हापूर
सौ. सोनू हरि काळे, रा. मिरज, सांगली
सौ. शारदा बंटीनाथ हातळगे, रा. जयसिंगपूर, कोल्हापूर
सदर गुन्ह्यातील पुढील तपास सहाय्यक फौजदार मेघराज रुपनर करत आहेत.
0 Comments