गोंदिया : रेल्वे मार्गाने वाढत चाललेल्या बेकायदेशीर तस्करीवर लगाम घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून ‘ऑपरेशन नार्कोस’ अंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत रेल्वे सुरक्षा बलाच्या (RPF) देखरेख पथक आणि गोंदिया पोलिसांनी मोठी कारवाई करत दुर्ग–गोंदिया मार्गावरील २०८५७ साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीमधून तब्बल २ किलो २०५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
ही कारवाई दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाच्या देखरेख पथकाला एका सोडून दिलेल्या ट्रॉली बॅगबद्दल संशय आला. प्रवाशांना विचारणा केल्यानंतरही कोणताही प्रवासी बॅग आपली असल्याचे सांगू शकला नाही. त्यानंतर गोंदिया स्थानकावर गाडी येताच नायब तहसीलदार, सरकारी पंच, श्वान पथक आणि शहर पोलिसांच्या उपस्थितीत सदर बॅग उघडण्यात आली. त्यामध्ये गांजाच्या एकूण ५ पॅकेट्स आढळून आली, ज्याची एकूण किंमत सुमारे १,०४,९०० रुपये आहे.
रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे प्रशासनाने अशा प्रकारच्या तस्करीला आळा घालण्यासाठी ‘ऑपरेशन नार्कोस’ मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार केला आहे.
रेल्वे स्थानकांवर तसेच गाड्यांमध्ये गस्त आणि तपासणी वाढवण्यात आली असून, नागरिकांनी संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments