तमदलगे येथील बसवान खिंडीत ६ मे रोजी घडलेल्या खुनाच्या घटनेचा उलगडा करत जयसिंगपूर पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. ही घटना केवळ आर्थिक नव्हे तर कौटुंबिक कारणांमुळे घडली असून, सख्या भावानेच आपल्या त्रासदायक भावाचा काटा काढण्यासाठी सहा लाखांची सुपारी दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील अविनाश उर्फ दिपक ओमगोंडा पाटील याचा अज्ञात इसमांकडून खून झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तयार केलेल्या पथकांनी सीसीटीव्ही फूटेज आणि तांत्रिक तपासातून संशयाच्या आधारे जिनगोंडा ओमगोंडा पाटील (भाऊ) याची सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
त्याने कबूल केले की, मृत अविनाश हा दारूच्या नशेत पत्नी व मुलांना मारहाण करत असल्याने त्रस्त होऊन त्याचा खून करण्याचा कट रचला गेला. यासाठी त्याने मित्र मोहन प्रकाश पाटील याच्या मदतीने राकेश उर्फ विनोद थोरात याला सुपारी देत खून करण्याचे ठरवले. तीन लाख आधी आणि तीन लाख नंतर देण्याचे मान्य केले.
राकेश थोरात याने हा खून करण्यासाठी किरण थोरात, सागर लोहार, अमर वडर या सहकाऱ्यांची मदत घेतली. आरोपींनी अविनाशवर पाळत ठेवल्यानंतर ६ मे रोजी त्याला बसवान खिंडीत निर्जन डोंगरात नेऊन डोक्यात दगड घालून हत्या केली.
जयसिंगपूर पोलिसांच्या अथक तपासानंतर खालील सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे:
-
जिनगोंडा ओमगोंडा पाटील (वय ३७, निमशिरगाव)
-
मोहन प्रकाश पाटील (वय ३३, निमशिरगाव)
-
राकेश उर्फ विनोद वसंत थोरात (वय २३, दानोळी)
-
किरण आमन्ना थोरात (वय २७, दानोळी)
-
सागर भीमराव लोहार (वय ३०, भादोले)
-
अमर रामदास वडर (वय ३३, भादोले)
या सर्व आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी या घटनेचा पर्दाफाश करून समाजमन हादरवणारी कुटुंबातील हिंसा समोर आणली आहे.
0 Comments