गांधीनगर येथील एका व्यापाऱ्याच्या कंपाउंडमधून 1 कोटी 78 लाख रुपयांची रोकड चोरणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्यांमध्ये एका विधी संघर्ष बालकाचाही समावेश आहे.
योगेश किरण पाडळकर, स्वयंम सचिन सावंत, सम्राट संजय शेळके आणि एका अल्पवयीन आरोपी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलीस तपासात या आरोपींकडून चोरीस गेलेली संपूर्ण 1 कोटी 78 लाख रुपयांची रोकड, गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, मोबाईल असा एकूण 1 कोटी 79 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही थरारक चोरी गांधीनगरमधील गुडलक स्टेशनरीच्या कंपाउंडमधून करण्यात आली होती. कंपाउंडचा पत्रा उचकटून आत प्रवेश करून टेम्पोत ठेवलेली रोकड ही चोरट्यांनी लांबवली होती. या प्रकरणी मूळचे बेळगाव (शहापूर) येथील कैलास वसंत गोरड यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील आणि सहाय्यक पोलिस अधीक्षक धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई पार पडली.
स्थानीय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक संतोष गळवे, जालिंदर जाधव, तसेच अंमलदार वैभव पाटील, महेंद्र कोरवी, योगेश गोसावी आणि राजू कांबळे यांच्या टीमने हॉकी स्टेडियम परिसरात छापा टाकून आरोपींना अटक केली.
पोलीस अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे इतक्या मोठ्या रकमेचा गुन्हा काही दिवसांतच उघडकीस आला असून उर्वरित तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरु आहे.
0 Comments