गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक भाग जलमय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोमवारी संध्याकाळी ५ वाजता राजापूर बंधाऱ्यावर पाणीपातळी १४ फूट होती. ती मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता तब्बल २५.३ फूट झाली आहे. म्हणजे अवघ्या २४ तासांत पाणीपातळीत १२ फूट वाढ झाली असून, ही वाढ एक विक्रम ठरली आहे.
या वाढीमुळे नदीकाठावरील गवत कुरणं, शेतं व अनेक खेडी जलमय झाली आहेत. ज्या वेगाने पाणी वाढत आहे, त्यावरून आजच नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिराच्या आवारात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
शिरोळ तालुक्यात प्रत्यक्ष पावसाचे प्रमाण फारसे नसले तरी धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने नद्यांमध्ये संथ गतीने पण सतत पाणी वाढ होत आहे. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी नदीकाठचा भाग तातडीने रिकामा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments