लग्न होऊन अवघे काही महिने झाले असतानाच एका विवाहितेने आपल्या पतीचा झोपेत असताना कुऱ्हाडीने निर्घृण खून केला. ही थरारक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली असून, कुपवाड पोलिसांनी आरोपी पत्नीला तातडीने अटक केली आहे.
मृत व्यक्तीचे नाव अनिल तानाजी लोखंडे (वय 53, रा. प्रकाशनगर, कुपवाड) असून, संशयित पत्नीचे नाव राधिका बाळकृष्ण इंगळे (वय 27, रा. वड्डी, ता. खटाव, जि. सातारा) असे आहे. याप्रकरणी अनिल यांचा नातेवाईक मुकेश मोहन लोखंडे (वय 35) यांनी कुपवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अनिल यांची पहिली पत्नी वारली असून त्यांना दोन मुलं आहेत. मे महिन्यात त्यांनी दुसरे लग्न करून राधिकाशी विवाह केला होता. मात्र लग्नानंतर अनिल हे पत्नी राधिकाशी सतत शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होते. याचा त्रास झाल्याने राधिकाने चिडून मंगळवारी मध्यरात्री झोपेत असलेल्या अनिलच्या डोक्यात कुऱ्हाड घालून त्याचा जागीच खून केला.
घटनेची माहिती मिळताच कुपवाडचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयित पत्नीला अटक केली असून, आज (बुधवार) दुपारी तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
0 Comments