सांगली महापालिकेतील उपायुक्त वैभव विजय साबळे (वय ३१, रा. फ्लॅट क्र. ४०३, ग्रीन एकर्स, धामणी रस्ता, मूळ रा. सातारा) यांच्यावर लाच मागण्याचा गंभीर आरोप सिद्ध झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी त्याला रंगेहाथ अटक केली. ही कारवाई होताच महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांच्या कंपनीमार्फत उभारण्यात येणाऱ्या २४ मजली इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या परवान्यासाठी साबळे याने दहा लाख रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी १७ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल झाली होती. २५ फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आली असता साबळे याने स्वतःसाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतर ही रक्कम सात लाखांवर आली आणि त्यानंतर सोमवारी ही सापळा कारवाई करण्यात आली.
साबळे याला सांगली महापालिकेच्या मुख्यालयातून ताब्यात घेण्यात आले. सायंकाळी उशिरा त्याच्या राहत्या घरी झडती घेण्यात आली. यावेळी काही महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नूतन उपअधीक्षक अनिल कटके आणि तत्कालीन उपअधीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये निरीक्षक विनायक भिलारे, किशोर खाडे, प्रतीम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, सीमा माने, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव आणि विना जाधव आदींनी सहभाग घेतला.
सांगली महापालिकेतील अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाच ही कारवाई झाल्यामुळे नागरिकांत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
0 Comments