पालकांचा हत्या असल्याचा आरोप, संस्थेवर तणाव
इचलकरंजी येथील एका शिक्षण संस्थेत बारावीत शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी समोर आली. मात्र, मृत विद्यार्थ्याच्या पालकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला असून, मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
यश अजित यादव (वय १७, रा. पडवळवाडी, ता. पलूस, जि. सांगली) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इचलकरंजीतील नामांकित संस्थेत बारावीचे शिक्षण घेत होता. आज सकाळी त्याने आत्महत्या केल्याचे कळताच संस्थाचालकांनी त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्यावर यशचे वडील अजित यादव, चुलते आणि नातेवाईकांनी याला जोरदार विरोध दर्शवला. त्यांनी शवविच्छेदन कोल्हापुरातच करण्याची मागणी केली. त्याचबरोबर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करत त्यांनी संस्थेच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी संबंधित संस्थेच्या फलकावर दगडफेक केली. या प्रकरणात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, परिसरात तणाव कायम आहे.
संस्थाचालकांनी माध्यमांशी बोलताना, “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यशने आत्महत्या का केली, याचा सखोल तपास केला जाईल. सर्व तथ्य बाहेर येतील, त्यानंतरच आम्ही प्रतिक्रिया देऊ,” असे सांगितले.
पोलीस प्रशासनाने तपास सुरू केला असून, पालकांच्या आरोपांची गंभीर दखल घेतली आहे. पुढील तपासानंतरच नेमकी कारणमीमांसा स्पष्ट होणार आहे.
0 Comments