मिरज शहरातील मंगळवार पेठेत चर्च जवळ बुधवारी दुपारी दोन तरुणांच्या गटात जुना वाद चिघळल्याने तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत एका गटाकडून गावठी पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली, तसेच वैभव यादव यांच्या सलून दुकानाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे.
ही घटना आज बुधवारी दुपारी घडली. वडर गल्लीत राहणाऱ्या काही तरुणांमध्ये पूर्वीपासून वाद सुरू होता. याच वादातून चर्चजवळील सलून दुकानासमोर दोन्ही गट आमने-सामने आले. या वेळी काठ्या आणि इतर शस्त्रांच्या सहाय्याने परस्परांवर हल्ला चढवण्यात आला. यादव यांच्या सलूनमधील खुर्च्या, काच, आणि साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.
हाणामारीदरम्यान अचानक गोळीबार झाल्याने रस्त्यावर अफरातफरी माजली. एका गावठी पिस्तुलातून हवेत गोळी झाडण्यात आली. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घाबरून गेले आणि मोठ्या प्रमाणात गर्दी जमली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक प्रणील गिलडा, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे आणि मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण रासकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी तपास करून रिकामे काडतूस जप्त केले.
या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या दोघांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
0 Comments