सांगली, दि. ९ जून : सांगली मिरज कुपवाड महापालिकेची स्थापना होऊन अनेक वर्षे झाली, मात्र आजतागायत या महापालिकेचा कारभार अजूनही ढिसाळ, भोंगळ आणि नागरिकांच्या समस्या डावलणारा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शहरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मिरजेतील गणेश नगर, इदगा नगर, शंभर फुटी रस्ता, सुंदर नगर आणि खासबाग या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, कचऱ्याचे ढिगारे, चोक झालेली गटारे, उघड्यावर पडलेली मैलयुक्त सांडपाणी आणि रोगराईचा धोका यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
महापालिका प्रशासनाचा कुठेही वावर जाणवत नाही. स्वच्छ भारत अभियानाचे फलक लावले जातात, मात्र प्रत्यक्षात रस्ते आणि गल्ल्या दुर्गंधीमय आहेत. “ही महापालिका आहे की खाजगी संस्था?” असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
"आम्ही वेळोवेळी तक्रारी करत आलो आहोत, पण कोणीही दखल घेत नाही. आता मात्र हा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. गरज पडल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू," असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
0 Comments