सांगली – एम. आय. डी. सी. कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील कुख्यात गुन्हेगारी टोळी प्रमुख किरण शंकर लोखंडे व त्याच्या साथीदारांवर मोठी कारवाई करत सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी २ वर्षांसाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपारीची (हद्दपारी) कारवाई केली आहे.
या टोळीविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, बेकायदेशीर जमाव जमविणे, पातक हत्यारे बाळगणे, गंभीर दुखापत करणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे सन २०२० ते २०२४ दरम्यान नोंद झाले होते. संबंधित टोळी समाजासाठी धोकादायक असून, कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान ठरणारी आहे, असे स्पष्ट होताच तडीपारीसारखी कठोर कारवाई करण्यात आली.
हद्दपार करण्यात आलेले आरोपी:
-
किरण शंकर लोखंडे (वय २३, रा. वाघमोडेनगर, कुपवाड)
-
संदेश रामचंद्र घागरे (वय २१, रा. वाघमोडेनगर, कुपवाड)
-
सोनू ऊर्फ बापू हरी येडगे (वय २८, रा. मायाक्कानगर, बामणोली)
एम. आय. डी. सी. पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल मिल्डा यांनी सखोल चौकशी केली. या तपासाअंती मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कायद्याच्या तरतुदीनुसार ही कारवाई केली.
या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींचे मनोबल खच्ची होण्यास मदत होईल. पुढील काळात सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अशा गुन्हेगारांवर अधिक कडक नजर ठेवून कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे.
0 Comments