मिरज तालुक्यातील आरग येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २१ वर्षीय तरुणाचा खून केवळ समलैंगिक संबंधास विरोध केल्याच्या कारणावरून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात दोन अल्पवयीन मित्रांचा सहभाग निष्पन्न झाला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मृत तरुणाचे नाव सुजय बाजीराव पाटील (वय २१, रा. आरग) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, २८ जून रोजी सुजय काही मित्रांसोबत कामानिमित्त बाहेर गेला होता, मात्र तो घरी परतलाच नाही. नातेवाईकांनी रविवारी रात्रीपासून शोध सुरू केला होता. अखेर, ३० जून रोजी सकाळी ६ वाजता त्याचा मृतदेह आरग पाझर तलावाजवळील मंदिर परिसरात विवस्त्र अवस्थेत आढळून आला.
पोलीस निरीक्षक अजित सिदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला असता, प्राथमिक माहितीतून समोर आले की, दारूच्या नशेत वाद झाल्यानंतर त्याला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला आणि मृतदेह तलावात फेकण्यात आला. या घटनेत दोन अल्पवयीन मित्र सहभागी असल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
सध्या मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक अधिक तपास करत असून, आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
0 Comments