Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक; रास्ता रोको आंदोलनात पोलिसांनी केली सहा आंदोलकांची अटक

 शेतकऱ्यांना उध्वस्त करून टक्केवारी लाटण्यासाठीच शक्तिपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे. हा महामार्ग रद्दच झाला पाहिजे, अन्यथा रक्त सांडावे लागले तरी चालेल, असा निर्वाणीचा इशारा खासदार विशाल पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.

मंगळवारी नागपूर-रत्नागिरी महामार्गावर अंकली येथील जैन वडा चौकात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन छेडले. आंदोलनाचे नेतृत्व खासदार पाटील, महेश खराडे आणि सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांनी केले. शक्तिपीठ बाधित शेतकरी बचाव समितीच्या वतीने आयोजित या आंदोलनात भर पावसात महिलांसह शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मारला.

आंदोलनादरम्यान "शेती आमच्या हक्काची नाही, नाही कुणाच्या बापाची!" आणि "या सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय!" अशा घोषणा देत संतप्त शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला. आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एक ऍम्ब्युलन्स आल्यावर मात्र आंदोलकांनी तात्काळ मार्ग मोकळा करून मानवतेचे उदाहरणही दाखवले.

खासदार विशाल पाटील म्हणाले, “आम्ही विकासाच्या विरोधात नाही. पण या महामार्गासाठी अनेक अवाढव्य पूल बांधले जाणार आहेत. यामुळे महापुरात शहरं आणि गावं पाण्याखाली जातील. हे शासनाने गांभीर्याने घ्यायला हवे.”

महेश खराडे म्हणाले, “कृषी दिनीच शेतकऱ्यांना रस्त्यावर बसावे लागत असेल तर ही या शासनाची शोकांतिका आहे. वर्धा-गोवा महामार्गाची मागणी कुणीच केलेली नाही. मग हे स्वप्न कुणाचे आणि त्यासाठी शेतकऱ्यांचे बलिदान का?”

या आंदोलनादरम्यान महेश खराडे, भरत चौगुले, श्रीधर उदगावे, उमेश एडके, भूषण गुरव, प्रदीप माने, महावीर चौगुले, शांतीनाथ लिंबेकाई यांना पोलिसांनी अटक केली, मात्र काही वेळातच त्यांची सुटका करण्यात आली.

यावेळी प्रभाकर तोडकर, सौ शुभगिनी शिंदे, सौ लता कांबळे, बाळासाहेब पाटील, यशवंत हारूगडे, संतोष आंबी, एकनाथ कोळी आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी व महिला उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments