मिरज तालुक्यातील मालगाव परिसरात खळबळजनक घटनेने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मालगाव गावाच्या हद्दीतील तानंग ते मालगाव रस्त्यावर कॅनॉलच्या पुलाजवळ एका युवकाची दोन अनोळखी इसमांनी निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मृत युवकाचे नाव बहादुर चाँद देसाई असून, तो शास्त्रीनगर, मालगाव येथील रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बहादुर देसाई हा घटनास्थळी दोन अनोळखी इसमांकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. मात्र, त्या दोघांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी बहादुर देसाईने त्यांच्यावर ब्लेडने वार करण्याची धमकी दिली. या वादातून अनोळखी व्यक्तींनी बहादुरवर शिवीगाळ करत, लाथा-बुक्क्यांनी व काठीने मारहाण केली, त्यामुळे बहादुर गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला.
घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर स्थानिक नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे.
पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत.
0 Comments