जत तालुक्यातील डफळापूर येथे स्थानिक व्यापाऱ्याच्या दुकानात घुसून मारहाण, जबरदस्तीने दुकान बंद करणे, रोख रक्कम व मोबाईल हिसकावणे तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, धाराशिव जिल्ह्यातून बाहेरून माणसे आणून गुंडगिरी करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
महेश दत्तात्रय पोतदार (वय 40, रा. डफळापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक 3 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता त्यांनी त्यांच्या आई सुनंदा पोतदार यांच्यासह आपले दुकान उघडले होते. दुपारी साडेबारा वाजता त्यांचे भाऊ संदीप पोतदार, वहिनी अश्विनी संदीप पोतदार आणि साथीदार प्रमोद महादेव पारखे (रा. धाराशिव) हे एमएच 10 DQ 7630 क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून दुकानासमोर आले.
प्रमोद पारखे यांनी दुकानाचे मुख्य गेट बंद केले आणि संदीप व अश्विनी पोतदार यांनी “तिजोरीच्या चाव्या दे, दुकान बंद कर” म्हणत ग्राहकांना बाहेर काढले. विरोध केल्यावर संदीप पोतदार यांनी महेश पोतदार यांना कानशिलात मारली, प्रमोद पारखे यांनी त्यांना धरून ठेवून मारहाण केली, आणि अश्विनी पोतदार हिने काठीने पाठीवर वार केले. सुनंदा पोतदार यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण झाली, यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.
त्यानंतर दुकानातील ड्रॉवरमधील ₹३०,००० रोख रक्कम व ट्रेझरीच्या चाव्या जबरदस्तीने काढून घेण्यात आल्या. सुनंदा पोतदार यांच्या हातातील मोबाईलही प्रमोद पारखे यांनी हिसकावून घेतला. तिघांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेत बाहेरून माणसे आणून दबाव निर्माण करत गुंडगिरी केल्याचा आरोप करण्यात आला असून, जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
0 Comments