तिरोडा तालुक्यातील मुण्डीकोटा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला आज दि. १४ जुलै रोजी नवीन रुग्णवाहिका मिळाल्याचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. मागील अनेक वर्षांपासून येथील नागरिक रुग्णवाहिकेच्या सुविधेची मागणी करीत होते. ही गरज जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत पूर्ण करण्यात आली आहे.
या उपक्रमात विशेष सहकार्य लाभले जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष, तसेच समाजकल्याण सभापती रजनी कुंभरे व जि.प. सदस्य किरण पारधी यांचे. त्यांच्या प्रयत्नातूनच ही रुग्णवाहिका मुण्डीकोटा उपकेंद्राला मिळू शकली. या उपकेंद्राअंतर्गत तब्बल २९ गावांचा समावेश असून, तातडीच्या आरोग्य सेवांसाठी रुग्णवाहिकेची तीव्र गरज होती.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रजनी कुंभरे (सभापती, समाजकल्याण), किरण पारधी (जि.प. सदस्य), कुंता पटले व वनिता भांडारकर (पं.स. सदस्य), प्रमिला भलावी, मनोज डोंगरे (माजी जि.प. सदस्य), सरपंच प्रतिमा जैतवार आदी उपस्थित होते. स्थानिक आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस व ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, आरोग्य सेवा आणखी प्रभावी करण्यासाठी अधिक सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.
0 Comments